Ad will apear here
Next
‘सवाई गंधर्व’ महोत्सवात झंकारले सरोद-सतारचे सूर
संतूरच्या सुरांनी दुसऱ्या दिवसाची सांगता
संदीप भट्टाचारजी

पुणे : केडिया बंधूंचे सतार आणि सरोद सहवादन, पंडित शिवकुमार शर्मा यांचे सुरेल संतूरवादन आणि संदीप भट्टाचारजी, मंजिरी आलेगावकर यांच्या सुस्वर गायकीने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना तृप्त केलं. 

गुरुवारी पहिल्या सत्राची सुरुवात किराणा घराण्याचे तरुण गायक संदीप भट्टाचारजी यांच्या दमदार गायनाने झाली. त्यांनी राग मुलतानीचे विलंबित एक ताल, द्रुत व मध्यलयीतील तीन ताल यांचे सादरीकरण केले. या वेळी ‘कवन देस गये..’, ‘गगन मुरलिया मोरी रे...’, ‘नैनमे आनबान..’ या रचना पेश केल्या. त्यानंतर  राग पूरियाधनश्रीमध्ये ‘खुश रहे सनम मेरा...’ ही बंदीश सादर केली. ‘बाजे रे मुरलिया बाजे...’ या भजनाने त्यांनी आपल्या मैफलीला विराम दिला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अनुजा भावे-क्षीरसागर व वैशाली कुबेर (तानपुरा), माऊली टकाळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.  

सतारवादक मोरमुकुट केडिया व सरोदवादक मनोज केडिया यांचे सहवादन

त्यानंतर झारखंडचे मोरमुकुट व मनोज केडिया या बंधूंचे सतार व सरोद वादन रंगले. त्यांनी राग झिंझोटीने आपल्या वादनास सुरुवात केली. ‘जहा स्वर हे वही ईश्वर है.’ असे म्हणत त्यांनी स्वरमंचाला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी राग मिश्रबिरू पेश केला. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्याची साथसंगत केली.

मंजिरी आलेगावकर

दुसऱ्या दिवसाची सांगता मंजिरी आलेगावकर यांचे स्वर व पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरच्या सुरांनी झाली. जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात जोड राग जयताश्री याने केली. यात त्यांनी ‘जब दे पियू सपनेमे..’, ‘बहुत दिन बिते...’ या रचना सादर केल्या. त्यानंतर राग नंदमध्ये ‘बन बन ढुंढ म्हारे सैया..’, ‘राजन अब तो आजा..’ या बंदिशी पेश केल्या. त्यानंतर कुमार गंधर्वांनी संगीत दिलेल्या संत कबीराचे भजन ‘हिरना समझ बुझ बन चलना...’ सादर करून त्यांनी मैफलीला विराम दिला. त्यांना अजित किंबहुने (तबला), रोहित मराठे (हार्मोनियम), कीर्ती कुमठेकर, सायली कडू (तानपुरा), स्वराली आलेगावकर यांनी साथसंगत केली.

पं. शिवकुमार शर्मा

त्यानंतर पं. शिवकुमार शर्मा यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी राग रागेश्रीमध्ये आपल्या संतूर वादनाची सुरुवात केली. आलाप, जोड नंतर झपताल व तीन तालातील रचना पेश केल्या. त्यांचे नादमधुर, सौंदर्यप्रधान वादन ऐकताना रसिकांचे भान हरपले होते. 

‘हा महोत्सव म्हणजे संगीतातील तीर्थस्थान आहे. पं. भीमसेन जोशी हे संगीतातील संत, योगी होते. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले. ते एक आध्यात्मिक व्यक्ति होते. त्या नात्याने आम्ही गुरु बंधुही होतो,’ अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या. त्यांना पं. शुभंकर बॅनर्जी (तबला), अराई ताकाइरो (संतूर सहवादन) यांनी साथसंगत केली.

निवेदक आनंद देशमुख यांचा सत्कार करताना पं. शिवकुमार शर्मा

निवेदक आनंद देशमुख यांचा सत्कार 
सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे गेली २९ वर्षे निवेदन करणारे लोकप्रिय निवेदक आनंद देशमुख यांच्या कारकिर्दीला ५१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

(दुसऱ्या दिवशीच्या सादरीकरणांचे काही व्हिडिओ सोबत देत आहोत.)







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZRACH
Similar Posts
सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ‘सवाई’ला सुरुवात पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान या ठिकाणी असलेल्या सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, बुधवार, ११ डिसेंबर रोजी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language